
मुंबई 21 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे इचलकरंजी पाणी पुरवठा प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्याच्या पंचगंगा नदीस्रोत व मजरेवाडी उदभव योजनांचे बळकटीकरण करावे, इचलकरंजी शहराची वाढ तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन म्हैसाळ बंधाऱ्यातून पाणीपुरवठा, दूधगंगा कॅनॉलमधून रेंदाळ येथील खाणीमध्ये पाणी साठवण करणे तसेच दूधगंगा कॅनॉलवरील पाझर तलावांचा स्रोत म्हणून उपयोग करणे या पर्यायांचा विचार करून अभ्यास अहवाल सादर करावा. दूधगंगामधून कॅनॉलद्वारे येणारे पाणी बंद पाईपलाईनमधून आणता येईल का याचाही अभ्यास करावा. त्याचबरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी स्ट्रक्चर उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. इचलकरंजीसाठीही असा प्रकल्प उभारता येईल का याचाही विचार करावा, असे आदेश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, खा. धैर्यशील माने दूरदृष्यप्रणालीद्वारे व संबंधित विभागांचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.