राज्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक आणि शाश्वत विकासाचा रोडमॅप
राज्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक आणि शाश्वत विकासाचा रोडमॅप
नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवाद कार्यक्रमाने आज नाशिक येथे कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा ठोस रोडमॅप सादर केला. विकास प्रक्रिया केवळ एका भागापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्याचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गामुळे नाशिकच्या विकासाला वेग येणार असून, वाढवण बंदराशी ग्रीनफिल्ड रोडद्वारे जोडणी झाल्यास औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) प्रभावी वापरामुळे कृषी आणि कायदा क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असून, गुगलच्या सहकार्याने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यात येत आहे. रतन टाटा स्कील युनिव्हर्सिटीमार्फत 10,000 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर नाशिकमध्ये ‘शेती प्रक्रिया उद्योगाचे मॉडेल’ यशस्वीपणे राबवले जात असून, सह्याद्री ॲग्रोने त्याचा आदर्श निर्माण केला आहे.
भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, महाराष्ट्राची 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था 2029 पर्यंत साध्य करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण ठरले असून, परकीय गुंतवणूक फक्त मुंबई-पुण्यापुरती मर्यादित न राहता इतर भागातही पोहोचत आहे.
आगामी कुंभमेळ्यात अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा संगम दिसून येईल, यात युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील विकासकामांत युवकशक्तीचा मोठा वाटा असेल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा हा ‘रोडमॅप’ राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.