नाशिक : रेशन दुकानांमधील रांगा, वेळेच्या मर्यादा आणि धान्याच्या मोजमापातील त्रुटींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. नाशिक रोड येथील गोरेवाडी रोड, डिस्टिलरी क्वार्टर परिसरात महाराष्ट्रातील पहिल्या 'अन्नपूर्ती धान्य एटीएम'चे लोकार्पण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासन आणि संयुक्त राष्ट्रांच्या 'जागतिक अन्न कार्यक्रम' यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वयंचलित धान्य वितरण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या सुविधेमुळे रास्तभाव दुकानांच्या वेळेचे बंधन संपले असून रेशनकार्डधारकांना दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस कधीही आपल्या हक्काचे धान्य मिळवणे शक्य होणार आहे.

रेशनकार्डधारकांना कामाच्या वेळा सांभाळून दिवसा किंवा रात्री कधीही आपल्या सोयीनुसार धान्य घेता येईल. या अत्याधुनिक मशीनद्वारे केवळ ३५ सेकंदांत तब्बल २५ किलोपर्यंत धान्याचे अचूक मोजमाप करून वितरण केले जाते. या एटीएमची एकूण साठवणूक क्षमता २५०० किलोग्रॅम इतकी असून याद्वारे गहू आणि तांदूळ सुरक्षित व स्वच्छ वातावरणात साठवले जातात. ९९.९९% अचूकता व गैरप्रकारांना चाप ई-पॉस आणि बायोमेट्रिक पडताळणीवर आधारित ही प्रणाली चालत असल्याने प्रत्यक्ष लाभार्थ्यालाच धान्य मिळेल, ज्यामुळे काळाबाजार आणि मध्यस्थांच्या हस्तक्षेपाला पूर्णपणे आळा बसेल.

राज्यात सुमारे ५४ हजार पारंपरिक रेशन दुकाने कार्यरत आहेत. नाशिकमधील या पहिल्या यशस्वी प्रयोगांनंतर लवकरच ही 'अन्नपूर्ती एटीएम' सुविधा ठाणे आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्येही टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाईल, ज्यामुळे नागरिकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक पारदर्शक सेवा मिळेल.