नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आठ आमदार निवडून आणू – मंत्री छगन भुजबळ
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार हिरामण खोसकर यांच्यासह प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश
नाशिक प्रतिनिधी
नाशिक,दि.१९ ऑक्टोबर:-नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे एकूण सहा आमदार आहे हिरामण खोसकर आपले सातवे आमदार आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेस पार्टीचे सर्वाधिक आमदार असून येणाऱ्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात आठ आमदार निवडून आणू असा विश्वास राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वर येथे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह प्रमुख नेत्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, जयवंतराव जाधव,शिवराम झोले,जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, कार्याध्यक्ष गोरख बोडके, विष्णूपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे,रवींद्र सपकाळ, संदीप गुळवे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, फिरोज पठाण, उदय जाधव, विनायक माळेकर, फिरोज शेख, पांडुरंग वारूगसे,उदयकुमार आहेर, प्रशांत कडू, ज्ञानेश्वर कडू, दशरथ भांगडे, जगन कदम, जयराम धांडे, जनार्दन माळी, शांताराम बागुल, विश्वास नागरे, सुरेश गंगापुत्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आमदार हिरामण खोसकर जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून आपल्यासोबत आहे. गेल्या निवडणुकीत ही जागा कॉंग्रेस पक्षाला गेल्याने त्यांना आपण कॉंग्रेस पक्षातून संधी दिली. ते कॉंग्रेसचे जरी आमदार असले तरी ते आपलेच आमदार होते. त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षात अन्याय झाल्याने अनेक महत्वाचे सहकारी आज राष्ट्रवादी मध्ये आले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा आमदार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी वळविण्यासाठी प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच हे प्रकल्प मार्गी लागून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागणार आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली. त्यामुळे आज राज्यातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघावयास मिळत आहे. या योजनेची सर्व जबाबदारी ही अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे असून त्यांनी लाडक्या बहिणींसाठी आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. महायुती सरकारकडून प्रत्येक घटकांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.